राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; या नेत्याचा पक्षाला रामराम

नाशिक : मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघाचे प्रमुख दावेदार माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी 20 नगरसेवकांसह ‘एमआयएम’मध्ये प्रवेश केला आहे. मुफ्ती यांच्या प्रवेशाने मालेगावात एमआयएमची ताकद वाढल्याचं दिसत आहे.

खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावच्या मुशावर्त चौकात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. तीन तलाकच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका न घेतल्याने मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी 20 नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याच कळतंय. 

नुकतेच मौलाना मुफ्ती इस्माईल हज यात्रेवरून मालेगावात परतले. मालेगावमध्ये दाखल होताच मुफ्ती यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मालेगावच्या राजकारणात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

मौलाना मुफ्ती यांनी मालेगावच्या राजकारणात स्थान निर्माण करत आधी जनता दल आणि नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मालेगाव मध्य मतदार संघातून 2009 साली जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी मिळवत थेट आमदारकीला गवसणी घातली होती.