मिताली राजची आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 2021 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं मितालेने सांगितलं आहे.

मी 2006 पासून आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केले. आता यानंतर 2021 च्या विश्वचषकासाठी स्वतःला तयार करण्यासाठी आणि माझी सर्व शक्ती त्यावर केंद्रीत करण्यासाठी मी निवृत्तीचा निर्णय घेत आहे. देशासाठी विश्वचषक जिंकण्याचं माझं स्वप्न अजून बाकी आहे. मला त्यासाठी माझं सर्वस्व द्यायचं आहे, असं मिताली राजने म्हटलं आहे.

मितालीने 32 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. टी-20 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. मिताली राजने आतापर्यंत 88 टी-20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 17 अर्धशतकांसह 2 हजार 364 धावा केल्या आहेत.

मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघीची पहिली टी-20 कर्णधार आहे. मिताली राजने 2012 मध्ये श्रीलंका, 2014 मध्ये बांग्लादेश आणि 2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलं आहे.

दरम्यान, महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर अशा नावानं ओळखल्या जाणाऱ्या मितालीनं 9 मार्च2019 मध्ये इंग्लंडमध्ये शेवटचा टी-20 सामना खेळला. या सामन्यात 32 चेंडूत 30 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-