कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी कोरोनाच्या बाबतीत सरकारच्या सूचनांबद्दल खबरदारी न घेता शिवजयंती साजरी केली होती. तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात काय फरक पडतो कोरोनामुळे. कोरोनाची सध्याची स्थिती बघता शासन जास्तच कठोर पावलं घेत असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता याच कोरोनामुळे मनसेला फटका बसला आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईवर कोरोनाचं सावट पाहता मनसेचा यावर्षीचा गुढीपाडवा मेळावा रद्द केला गेला आहे. मनसेने तशी घोषणा केला आहे. मनसेने परिपत्रक काढून येत्या 25 मार्चला होणारा मनसेचा मेळावा रद्द करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

दरवर्षी गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होत असतो. पण या वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनसेने हे पाऊल उचललं आहे. राज्यातले अनेक कार्यक्रम, सभा, मेळावे रद्द करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनसेने मोठा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रात 3 दिवस खबरदारी म्हणून सर्व दुकाने, मॉल्स, व्यायामशाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.