“सरकार कोणाचंही येऊ द्या मंत्री फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचेच”

नाशिक : राज्यात सरकार कोणाचंही येऊ द्या, मंत्री मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच होणार आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप-शिवसेनेला टोला लागवला. नांदगावातील मेळाव्यात त्या बोलत होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतं, त्यांनी संघर्ष केला आणि शेवटी मंत्री आमचेच होणार. मंत्री करतो म्हणूनच सर्वांना घेतलं जातंय, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकीकडे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे, तर सुप्रिया सुळे यांनीही संवाद दौरा सुरु केलाय. सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. हा दौरा नंतर नांदगावमध्येही पोहोचला. राज्यातील समस्या जाणून घेण्यासाठी संवाद दौरा काढला असल्याचं सुप्रिया सुळेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

बेरोजगारी, आर्थिक मंदी यावरुन सुप्रिया सुळे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. याचवेळी राष्ट्रवादीमधून सुरु असलेल्या आऊटगोईंगवरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात?, त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते?, भाजपने त्या पावडरचं नाव सांगावं,’ असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.

पवार साहेब कृषीमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते. जेव्हा सभागृहात कांद्याचा मुद्दा येत असे तेव्हा विरोधक साहेबांवर धावून जात. परंतु त्यांनी केवळ शेतकरी हिताचाच विचार केला. हेच विरोधक आज सत्तेत आहेत, पण कांदा असो किंवा दूध, त्यांचे दर वाढले, पण कोणीही काहीही बोलत नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शेतकरी प्रश्नांवरुनही सरकारला धारेवर धरलं.

स्वर्गीय सुषमा स्वराज एकदा तत्कालिन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांना म्हणाल्या होत्या की ‘आँकडो से पेट नहीं भरता. पेट भरता है धान से’, या मुख्यमंत्र्यांना मला हेच सांगायचं आहे. महाजनादेश यात्रेतून फक्त आकडे फेकू, नका तर लोकांचे प्रश्न सोडवा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-