“एखादी मुलगी जर आत्मविश्वासाने मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणत असेल तर बिघडलं कुठं?”

परळी | पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्रिपद यांची नेहमीच चर्चा होत असते. पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री व्हावं, त्या जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत, अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून वारंवार बोलून दाखवली जाते. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनात नेमकं काय आहे, याचा खुलासा त्यांनी आज गोपानाथ गडावरच्या त्यांच्या भाषणात केला.

मी मुख्यमंत्री व्हायचंय, असं मी कधीच म्हणाले नाही. पण जर म्हणाले तर काय पाप केलं? एखादी मुलगी आत्मविश्वासाने म्हणते की मला राज्याचं मुख्यमंत्री व्हायचंय तर तिने म्हणू नये? मी मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हणाले नाही. पण मला इतकं हिणवलं गेलं की जणू मी लायकच नाही कशाचा, असं म्हणत पंकजा यांनी आपली खंत बोलून दाखवली.

भाजपचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी थोडं का होईना योगदान दिलं. राज्यभर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरले. काही उमेदवारांच्या प्रचाराला जाऊ शकले नाही, याची खंत आहे, असंही पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, मी कुठल्याही पदासाठी लालची नाही. असं म्हणत भाजपच्या कोअर कमिटीमधूनही बाहेर पडत असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-