“काँग्रेस-राष्ट्रवादी तर आमच्या खिजगणतीतही नाही”

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी संपुष्टात आल्याने वंचितची लढाई खरंतर भाजप विरोधात आहे. आम्ही काँग्रेसबरोबर नाही, किंबहुना काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्या खिजगणतीतही नाहीत, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला फटकारलं. आगामी विधानसभेसाठी वंचित आघाडी भाजप विरोधात 288 जागांसाठी लढणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षाची जागा वंचित आघाडीला दिली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. हे वक्तव्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्याची अवस्था पाहून एकप्रकारे खरं आहे. मात्र वंचितची झेप सत्ता संपादन करण्यापर्यंत आहे. पुढच्याच आठवडयात वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या काही उमेदवारांची यादी जाहीर होईल, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे.

सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यास निवडून येण्याची कुणालाच खात्री नसल्यामुळेच लोक त्यांना सोडून जात आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

लोक काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना कंटाळले आहेत. यामुळे या दोन्ही पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आता काँग्रेस-राष्ट्रवादी हे गळ्यातील लोढणे वाटू लागले आहे. पण यापुढे मतदारांची विभागणी थेट भाजप आणि वंचित आघाडी या दोघांमध्येच होणार आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एमआयएमला आम्ही 8 जागांची ऑफर दिलीच नाही. आमचं दार त्यांच्यासाठी अजूनही खुलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-