राज ठाकरेंना का भासतेय डॉ. मनमोहन सिंग यांची उणीव?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर सिंग यांना शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. राज ठाकरेंनी मनमोहन सिंग यांची या पोस्टमध्ये स्तुती केलीय. एवढंच नव्हे तर चक्क तुमची उणीव भासतेय, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कधीकाळी मनमोहन सिंग यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या राज ठाकरे यांचा हा पवित्रा त्यामुळेच अनेकांसाठी आश्चर्यजनक आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेचं काहींनी स्वागत केलं आहे तर राज ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या काही जणांना ही भूमिका पटलेली नाही. सध्या सोशल मीडियात यावरुन उलटसुलट चर्चा सुरु आहेत. 

फेसबुक पोस्टमध्ये नक्की म्हटलंय काय?

देशाला आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांचा आज वाढदिवस.
१९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली, त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग ह्यांची निर्भत्सना करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता.

पण देशाची अर्थव्यवस्था, आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना, माझ्या सकट, तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल, तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढलात त्याचं महत्व, आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे.

राजकारणात टीका होतच असते, ती कधी काळी आम्ही पण केली, पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे .
डॉ.मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन “इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल.’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

राज ठाकरेंवर टीकास्त्र-

राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत होताना दिसत असलं तरी अनेकांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेला विरोध केला आहे. एकेकाळी हेच राज ठाकरे मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्यात, त्यांच्या अबोल असण्याची खिल्ली उडवण्यात आघाडीवर होते. आज राज ठाकरेंना मनमोहन सिंग यांच्याबद्दल एवढं प्रेम का वाटायला लागलं, असा सवाल काहींनी केला आहे. राज ठाकरेंच्या अशाच भूमिकेमुळे मनसेचं वाटोळं झालं, अशा अर्थाच्या टीकाही काही जणांनी केल्या आहेत. दरम्यान, मनसेचे बहुतांश कार्यकर्ते नेहमीप्रमाणे राज ठाकरेंच्या भूमिकेच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. मनसेच्या काही कार्यकर्त्यांना तसेच राज ठाकरेंच्या चाहत्यांना मात्र ही स्तुतीसुमनं पटलेली नाहीत. राज ठाकरेंच्या पोस्टवर त्यांनी तशी नाराजी देखील व्यक्त केली आहे.