वर्दीत प्री-वेडिंग शूट करणं ‘या’ अधिकाऱ्याला पडलं महागात; बजावली नोटीस

जयपूर: खाकी वर्दी घालून बायकोसोबत प्री-वेडिंग व्हिडीओ शूट करणं राजस्थानातील पोलिसाच्या अंगलट आलं आहे. व्हिडीओमध्ये पत्नीकडून लाच घेतानाचं दृश्य दाखवल्यामुळे वरिष्ठांची नाराजी ओढवली आहे. अखेर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याच नाव धनपत अस आहे.

राजस्थान पोलीस विभागात कार्यरत असलेल्या धनपतने आपली होणारी पत्नी किरणसोबत प्री-वेडिंग व्हिडीओ शूट केलं होतं. उदयपूरमध्ये शूट केलेला हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याच्या वरिष्ठांच्याही नजरेत आला.

या व्हिडीओतील एका दृश्यावरुन आक्षेप घेण्यात येत आहे. ट्राफिक ड्युटीवर नाकाबंदीसाठी उभा असताना धनपत एका विनाहेल्मेट दुचाकीस्वार तरुणीला अडवतो. तिने कारवाई टाळण्यासाठी दिलेली लाच तो स्वीकारतो.

लाचेची रक्कम ठेवण्यासाठी धनपत पाकीट काढायला जातो, तेव्हा त्याचं पाकीट गायब असतं. त्या तरुणीनेच ते चोरल्याचं धनपतला जाणवतं. अशाप्रकारे दोघांच्या भेटीगाठी वाढत जातात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, अशी कथा व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे.

पोलीस लाच स्वीकारतानाचं दृश्य पाहून धनपतच्या वरिष्ठांचा तीळपापड झाला. पोलीसांची प्रतिमा मलिन होत असल्याचा दावा करत त्यांनी पोलीस महानिरीक्षकांच्या कानावर ही गोष्ट घातली.

खाकी वर्दीचा गैरवापर केल्याबद्दल धनपतला पोलीस महानिरीक्षक डॉ. हवा सिंग घुमरिया यांनी नोटीस बजावली आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-