“गुंतवणूक केलीच नाही मग राज ठाकरेंना 20 कोटींचा नफा झालाच कसा???”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर स्वेअरच्या व्यवहारामध्ये २० कोटींचा फायदा कसा झाला याचा तपास सक्तवसुली संचलनालय करत आहे. कोहिनूर स्वेअर टॉवर्स बांधणाऱ्या ‘मातोश्री’ रिअल्टर्स या कंपनीमध्ये भागीदार असणाऱ्या राज यांनी खासगी गुंतवणूक केलेली नसतानाही त्यांना इतका फायदा कसा झाला याचा तपास ईडी करत आहे.

या कंपनीमध्ये राज यांचा 25 टक्के वाटा होता. या प्रकरणामध्ये ‘ईडी’ सध्या वेगवेगळ्या कागदपत्रांची पडताळणी करत असून गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाईल.

राज ठाकरे यांनी राजन शिरोडकर आणि इतर सात मित्रांसोबत ‘मातोश्री’ रिअल्टर्स या कंपनीचा स्थापना केली होती. या कंपनीने सहकारी बँकेकडून तीन कोटींचे कर्ज घेतले. तसेच एक कोटींची अतिरिक्त आर्थिक मदतही या कंपनीला मिळाली. एवढी मोठी रक्कम या कंपनीला कशी मिळाली याच संदर्भात ईडीला प्रश्न असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

2005 साली मातोश्री रिअल्टर्सने बँकेकडून मिळालेले तीन कोटी आणि अतिरिक्त एक कोटी असे एकूण चार कोटींची गुंतवणूक कोहिनूर टॉवर प्रकल्पामध्ये केली. मात्र अचानक 2008 साली या कंपनीने आपल्याकडील हिस्सा 80 कोटींच्या किंमतीला कोहिनूर सीटीएनएलकडे सुपूर्द करत या प्रकल्पामधून काढता पाय घेतला.

या 80 कोटींपैकी 20 कोटी रुपये राज ठाकरेंना देण्यात आले असं सुत्रांच म्हणणं असल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. मात्र जमीनीची किंमत वाढल्याने या प्रकल्पामधून आम्हाला फायदा झाल्याचे राज ठाकरे आणि शिरोडकर यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते.

महत्वाच्या बातम्या-