कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची ईडीकडून चौकशी करा; राजू शेट्टींची मागणी

मुंबई : कडकनाथ कोंबडी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराचा अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) तपास केला जावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी आज मुंबईमधील ईडी कार्यालयात जाऊन यासंदर्भातील ईडीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘कडकनाथ कोंबडी पालन’ व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ने राज्यभरातील शेतकऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्रकरण पुढे आले असून कंपनीच्या संचालक मंडळवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अ‍ॅग्रो कंपनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप करीत शेट्टी यांनी हे प्रकरण स्वाभिमानीच्या वतीने धसास लावण्याचा इरादा व्यक्त केला आहे. तर, खोत यांनी याचा इन्कार केला असून शेट्टी खोटी माहिती पसरवत असल्याचे नमूद केले आहे. कंपनीशी संबंधित लोक आपले नातेवाईक असल्याचे शेट्टी यांनी सिद्ध करून दाखवावे असंही खोत यांनी म्हटले आहे.

कडकनाथ कोंबडी पालनात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून राज्यातील अनेकांची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले असताना शहरातील ६६ जणांना पावणेदोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

कडकनाथ कोंबडी प्रकरणी महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लि. तसेच रयत अ‍ॅग्रो इंडिया या कंपनीच्या संस्थापक, संचालक, लेखापाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-