मावळ्यांनी बलिदान दिलं ते किल्ले भाड्याने देण्यासाठी का?- अमोल कोल्हे

मुंबई | राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा 25 किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत.

गड- किल्ले फक्त हॉटेलच नाही तर लग्नसमारंभ आणि करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मावळ्यांनी बलिदान दिलं ते किल्ले भाड्याने देण्यासाठी का? जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं अशी टीका अमोल कोल्हेंनी केली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हीडिओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

शिवसृष्टी नसेल तर शिवचरित्रातला त्या गडाशी संबंधित एखादा प्रसंग उभा राहू शकतो. त्यातून पर्यटनाला वेगळी चालना मिळू शकते, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

जवळपास किती वेगळ्या जातींचे पक्षी या गडकोटांवर असणाऱ्या वनात आहेत. तेथील जीवसृष्टीचं रक्षण केलं जाऊ शकतं. आणि तिथे येणाऱ्या लोकांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, शाश्वत विकासाचा विचार करुन आणि त्याहीपलीकडे जाऊन इतिहासाशी प्रामाणिक राहून या गडकिल्ल्यांच्या बाबतीच विचार करावा, अशी विनंती अमोल कोल्हेंनी केली आहे.

https://www.facebook.com/Dr.AmolKolhe/videos/520963345321539/