शिवसेनेकडून निष्ठावंतांचा पत्ता कट, आयारामांना संधी; करमाळ्यात नारायण पाटलांना मोठा धक्का

सोलापूर : शिवसेनेने करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट झाला आहे. तर रश्मी बागल यांच्या पदरात उमेदवारी पडली आहे.

राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. दोन दिवसापूर्वी ‘मातोश्री’वर आलेल्या रश्मी बागल  सकाळपासून मातोश्रीवर होत्या. त्या रात्री रिकाम्या हाताने परतल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल यांनी दिलं होतं. विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांनी ‘मातोश्री’वर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता.

रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पण स्थानिक शिवसेना आमदाराची यामुळे नाराजी ओढावली आहे.

मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील म्हणाले होते. शिवाय त्यांनी त्यांची भूमिका पक्षासमोरही मांडली होती.

तिकिटाबाबत मी आशावादी नाही, तर मला खात्री आहे की उद्धव साहेब मला उमेदवारी देतील. मला शिवसैनिकांचा विरोध नाही, उलट मी प्रवेश केला तेव्हा करमाळ्यात शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं होतं, अशी प्रतिक्रिया रश्मी बागल यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या-