“फडणवीसांचं वागणं म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा”

पुणे | PM Care फंडाला मदत करून, तसंच भाजपा कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन करणारे देवेंद्र फडणवीस हे कोरोनाच्या काळात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी एक बेजबाबदार विरोधी पक्षनेते म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. आज तर त्यांनी राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केलेली आहे, पण त्यांना तो नैतिक अधिकार मात्र राहिलेला नाही. फडणवीसांचं वागणं म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा असे आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केली आहे.

कदाचित देवेंद्र फडणवीसांना केंद्र सरकारचे जे 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केलेले आहे त्यातील तथ्य आणि खरेपणा लक्षात आलेला असावा. म्हणून राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करताना दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला. परंतु केंद्र सरकारने अजून राज्याच्या GSTचे 21 हजार कोटी रुपये अद्याप दिलेले नाही. यावर तुमची विरोधी पक्षनेते म्हणून मोदींना पत्र लिहून जाब विचारण्याची तरी ताकद आहे का?, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

तुम्ही सत्तेतून पायउतार होताना राज्यावर 6 लाख कोटी 71 हजार पेक्षा अधिक कर्ज करून ठेवले आहे. तुमच्या या कर्जाच्या डोंगरामुळे आज राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. केंद्र सरकार देखील हक्काचे पैसे देत नाही आहे. तसेच आत्ताच महाविकास आघाडी सरकारने 31 मार्च 2020 पर्यंत राज्यातल्या 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार निश्चित राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर यांच्या पाठीशी उभे राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांनी वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर उपाययोजनाबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली आहे. पवारांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्रातील उद्योग जोमाने सुरू होतील, राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा गती घेईल, असा विश्वास देखील वरपे यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्री घराबाहेरच पडत नाहीत, मग कारभार काय फेसबुकवरून चालणार का?”

-निलेश राणेंनी रोहित पवारांची काढली लायकी… दिली शेंबड्या पोराची उपमा