तगमगणाऱ्या सर्व जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरेंनी सरकारदरबारी मांडलं पण… संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याची अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुरळित व्हावी आणि राज्याच्या तिजोरीत काही महसूल जमा व्हावा म्हणून दारूची दुकाने उघडी ठेवण्याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना शालजोडीतून टोले लगावले आहेत.

राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल, असा टोला लगावत बाकी सर्व भार सरकारवर असल्याचं सांगत राज ठाकरे यांच्या मागणीचा सरकार अंतिम निर्णय घेईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

वाईन, डाईन, फाईन, व्वा राजबाबू व्वा, अशा मथळ्याखाली संजय राऊत यांनी आजचा अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या मागणीचे काय परिणाम होऊ शकतात, याचा सविस्तर उलगडा केलेला आहे. घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱ्या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. वाईन शॉप सुरू करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी व हाणामारी. लोकं भाजी, अन्न, धान्य वगैरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत, पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल त्याची कल्पनाच करवत नाही. पस्तिसेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारू खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखीच असेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरडय़ा घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो. वितरक जेव्हा कारखान्यांकडून दारूचा साठा विकत घेतो तेव्हा विक्री केलेल्या दारूवर कारखानदार हा उत्पादन शुल्क आणि विक्री कर शासनाकडे भरतात. त्यामुळे आधी कारखाने मग दुकाने चालू करावी लागतील, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“मुख्यमंत्र्यांनी सांगावं, मी नागपुरात बसल्या बसल्या लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो”

-“काँग्रेस पक्षाला मात्र मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही”

-अहमदनगरच्या लेकीचा पराक्रम; आता अवघ्या 15 मिनिटात कळणार कोरोना आहे की नाही…

-पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

-अन्य राज्यात अडकलेल्या यूपीच्या मजुरांसंदर्भात योगी सरकारचा मोठा निर्णय