पुणे महाराष्ट्र

रामराजे थांबलेल्या विश्रामगृहात उदयनराजे शिरले… पुढे नेमकं काय घडलं?

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील संघर्ष सध्या चांगलाच पेटलाय. आज तर चक्क रामराजे थांबलेल्या विश्रामगृहावरच उदयनराजे यांनी थेट धडक मारली. उदयनराजेंच्या येण्यानं विश्रामगृहावर एकच खळबळ उडाली होती, मात्र पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांच्यातील संघर्ष टळला. 

रहिमतपूरचा कार्यक्रम उरकून रामराजे शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी थांबले होते. सकाळी ते जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पोहोचले. या बैठकीला उदयनराजेही येणार असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उदयनराजे आले खरे मात्र सही करुन निघून गेले. संघर्ष टळला असंच सगळ्यांना वाटलं होतं. 

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आटोपल्यानंतर रामराजे पुन्हा शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. याठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील रामराजेंना भेटण्यासाठी आले होते. दोघांची चर्चा सुरु असताना खासदार उदयनराजे विश्रामगृहावर अवतरले. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची या प्रकारामुळे एकच तारांबळ उडाली. 

शासकीय विश्रामगृहावर आलेले उदयनराजे प्रचंड संतापलेले होते. ते अत्यंत आक्रमक भाषा वापरत होते. उदयनराजे आल्याचं कळताच संदीप पाटील यांनी बाहेर धाव घेतली. तोपर्यंत पायऱ्या चढून उदयनराजे रामराजेंच्या चेंबरकडे निघाले होते. संदीप पाटील यांनी त्यांना रस्त्यातच गाठलं.

संदीप पाटील यांनी उदयनराजे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संदीप पाटील यांच्यामुळे उदयनराजे माघारी फिरले. या भगीरथामुळेच जिल्ह्याचं वाटोळं झालं, असं म्हणतच ते गाडीत बसले आणि निघून गेले. दरम्यान, रामराजे शासकीय विश्रामगृह सोडेपर्यंत याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

IMPIMP