उद्याचा महाराष्ट्र तरूणांच्या हातात द्यायचाय- शरद पवार

बीड |  यंदाच्या निवडणुकीत आम्ही पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं निश्चित केलं आहे. हा महाराष्ट्र तरुण पिढीच्या हाती देऊन उद्याचा महाराष्ट्र घडवायचा आहे, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडमध्ये बोलताना केलं. शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज (बुधवार) त्यांनी बीडच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं.

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते पक्षाची साथ सोडून सत्ताधारी भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. मात्र ज्यांना जायचंय त्यांना खुशाल जाऊ द्या… आता जाणाऱ्यांची चर्चा न करता येणाऱ्यांची चर्चा करा. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. संपत्तीच्या डोंगराला सुरूंग लावायची क्षमता तरूणांमध्ये आहे, असं ते म्हणाले.

पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना घेऊन विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचं पक्षापुढे मोठं आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर तरूणांना राष्ट्रवादीत अधिकाधिक संधी मिळेल, अशी घोषणा गेले अनेक ते विविध सभांमधून करत आहेत.

आज बीडमध्ये आगामी विधानसभेसाठीची 5 नावे जाहीर केली. जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा यांच्यासारख्या युवा नेत्यांना पवारांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली.

दरम्यान आपल्या पक्षातून निघून जाताना या भागातील नेत्यांनी विकासासाठी पक्ष सोडत असल्याचे वक्तव्य केले. पक्षात असताना तुम्ही १५ वर्षे आमदार झालात, तुम्हाला राज्यमंत्रीपद दिले, मग या १५ वर्षांत तुम्ही नेमकं काय केलं, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-