मी अजून म्हातारा झालो नाय… अजून लई जणांना घरी पाठवायचंय- शरद पवार

सोलापूर |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर तसेच सोडून गेलेल्या पक्षातील नेत्यांवर जोरदार टीका केली. मी अजून म्हातारा झालो नाय… अजून लई जणांना घरी पाठवायचंय, असा सूचक इशारा त्यांनी पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांना दिला.

सोलापूर या स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्यांना लोक जागा दाखवतात. पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत, अशा शब्दात त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर शरसंधान साधलं.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात 1957 साली काँग्रेसचा पराभव झाला. मात्र, सोलापुरात काँग्रेस जिंकली. त्यामुळे विधानसभेत इतर ठिकाणी काय झालं याची काळजी करू नका, असं म्हणत त्यांनी इतिहासातील आठवणींना उजाळा दिला अन् सोलापूरमध्ये इतिहास घडवा, असं आवाहन सोलापुरकरांना केलं.

सत्ता येते-जाते, त्याची काळजी नाही. मी 52 वर्षांपासून निवडून येतो. निवडून येण्याचा हा विक्रम आहे. जनतेमुळे इतके यश प्राप्त झालंय. त्यामुळे यश मिळणारच आणि इतिहास घडवणारच, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पक्षाला सोडून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? जे  गेले ते आपल्यासाठी संपले…. आता येणाऱ्यांचं नाव काढा, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-