शरद पवार पंतप्रधान व्हावेत यासाठी बाळासाहेबांचा पाठिंबा; ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दृश्य

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं. राजकारणाच्या पलिकडे दोन्ही नेत्यांनी ते नातं जपलं हे उभ्या देशाला माहीत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. खासदार संजय राऊत यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातील संबंध जवळून पाहिले आहेत, त्यामुळे त्यांना या नात्यातील सौहार्द माहीत आहे. सिनेमामध्ये देखील त्यांनी या नात्याचा अंतर्भाव केला असण्याची शक्यता आहे. याची एक छोटीशी झलक या सिनेमाच्या ट्रेलमध्ये देखील पहायला मिळत आहे. 

नेमकं काय आहे हे दृश्यं?-

ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं एक दृश्य दाखवण्यात आलं आहे. या दृश्यात बाळासाहेब आणि शरद पवार कोणत्यातरी विषयावर चर्चा करत असल्याचं पहायला मिळत आहे. नाही मला नेमकी वाटतं की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं बाळासाहेब शरद पवारांना म्हणत असल्याचं या दृश्यात दिसत आहे.

या दृश्याची एकच चर्चा-

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. एक हिंदी आणि दुसरा मराठी… त्यातील मराठी भाषेतील ट्रेलरमध्ये बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातील हे दृश्य दाखवण्यात आलं आहे. सध्या केंद्रातील मोदी सरकारसोबत शिवसेनेचे संबंध सलोख्याचे नाहीत. उठता बसता शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेचे बाण सोडत असते. सामनाच्या अग्रलेखात तर सारखा-सारखा भाजपवर निशाणा साधलेला पहायला मिळतो. अशा परिस्थितीत येणाऱ्या ठाकरे सिनेमामध्ये पंतप्रधानपदाविषयी चर्चा करणारं वक्तव्य दाखवल्याने आता या दृश्याची एकच चर्चा रंगली आहे. 

मराठी माणसाला होता बाळासाहेबांचा पाठिंबा-

मराठी माणूस पंतप्रधान व्हावा याला बाळासाहेबांचा पाठिंबा होता. त्यांनी आपल्या हयातीत अनेकदा हे बोलून दाखवलं आहे. अशाच प्रकारचा एक प्रसंग आला असताना त्यांनी पक्ष वगैरे विचार न करता एकदा तशी भूमिका सुद्धा घेतली आहे. प्रतिभाताई पाटील यूपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार होत्या, तेव्हा प्रतिभाताई मराठी आहेत केवळ या एकाच मुद्द्यावर बाळासाहेबांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होतील, अशी शक्यता निर्माण झाली असती तर त्यांनी निश्चितच तशा पद्धतीचा निर्णय घेतला असता. सध्या मात्र त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरमुळे मराठी माणूस पंतप्रधान करण्याच्या त्यांच्या स्वप्नाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. 

पाहा व्हीडिओ-