शेहला रशीदविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली |  भारतीय लष्कराबाबत खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून जेएनयूची विद्यार्थीनी शेहला रशीदविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर रोजी शेहला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने सांगितलं आहे.

काश्मीर खोऱ्यात सैन्य कारवाई झाल्याची चुकीची माहिती तिने ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्याविरोधात देशद्रोहासहित द्वेष निर्माण करणं, शांतता भंग करणं आणि उपद्रव निर्माण केल्याचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्लीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय लष्कर काश्मीर खोऱ्यात लोकांची धरपकड करत आहे. त्यांच्या घरात छापेमारी करत असून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीर खोऱ्यात सत्ताधारी भाजपचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी मानवाधिकाराचं हनन केलं जात असल्याचा दावा शेहलाने केला होता.

दरम्यान, भारतीय लष्कराने शेहलाचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर शेहलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-