“विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले होते. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर देखील सहभागी झाले होते. यावरून सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेनं गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा कोरोनाचे कारण देत पुढे ढकलल्यानंतर याविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुतेही सहभागी झाले होते. याशिवाय, अनेक भाजप नेत्यांनी या निर्णयाचा विरोध करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून, “विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”, अशा शब्दात भाजप नेत्यांवर खोचक टीका करण्यात आली आहे.

विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?, असं म्हणत शिवसेनेनं पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे असं विरोधी पक्षाचं चाललं आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले.

पेट्रोल, डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय? विरोधी पक्षहो, आगीत तेल ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करत आहे काय?, असा सवाल शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपला केला आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विद्यार्थ्यांना जमवून भिकार राजकारण करीत आहे व विद्यार्थ्यांची माथी भडकवून त्यांना सरकारविरुद्ध लढायला भाग पाडत आहे. विद्यार्थी आणि पोलिसांत झगडा लावायचा व आपण मजा बघायची अशी मानसिकता यात दिसते, अशा शब्दांत शिवसेनेने अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढू लागला आहे व त्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच चिंता व्यक्त केली. हे संकट असेच वाढत राहिले तर नाइलाजाने कडक ‘लॉक डाऊन’ लादावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामागची भावना विरोधी पक्ष समजून घेणार नसेल तर त्यांचे राजकारण मानवतेचे उरले नसून त्यांच्या राजकारणात वैफल्यातून निर्माण झालेली अमानुषता स्पष्ट दिसू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या –

उन्हाळ्यात दही खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

    खुशखबर! आता सोनं झालंं आणखी स्वस्त; वाचा आजचे दर

      सर्वसामान्यांना मोठा दिलासा! वाचा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

        ‘तुम्ही सरकारचे कुत्रे आहात’; माजी मंत्री आणि पोलिसांच्यात राज्यसेवा परीक्षांवरुन वाद; पाहा व्हिडिओ

          ‘आता चाय पे चर्चा होऊनच जाऊद्यात’; नाईक कुटुंबियांचं भाजपला खुलं आव्हान