“तुमच्या रथावर स्वार झालेले खासदार कोल्हे हे शिवसेनेचं पार्सल”

मुंबई : राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचं पार्सल आहे आणि ते तुमच्या रथावर चढल्यानं स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही, अशी कोपरखळी शिवसेनेनं लगावली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून शिवसेनेनं राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या स्वाभिमानाच्या मुद्याचा शिवसेनेने उदाहरणांसह समाचार घेतला आहे.

पवारसाहेब तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी पवारांनी वापरलेल्या स्वाभिमान या शब्दावर बोट ठेवले आहे.

खरे तर ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये. राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही, असं सामनामध्ये म्हटलं आहे. 

उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाताच त्यांची सर्व कामे मुख्यमंत्र्यांनी त्याच दिवशी केली. पण, नवी मुंबईचे गणेश नाईक ठाण्यातील भाजपच्या कार्यक्रमात गेले. तेथे त्यांना बसायला कुणी खुर्ची दिली नाही असे प्रसिद्ध झाल्याचंही सामनामध्ये म्हटलं आहे.

येथे पुन्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतोच. माणसे आणि वकुब पाहून विकासकामे व स्वाभिमानाचे तुरे मिरवले जातात. पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

महत्वाच्या बातम्या-