आनंद शिंदे यांची राजकारणात एन्ट्री; केला ‘या’ पक्षात प्रवेश

सोलापूर : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. सोलापुरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी ही माहिती दिली.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ राखीव आहेत. त्यामुळे आनंद शिंदे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आनंद शिंदेचा मंगळवारी इंदापूरजवळ अपघात झाला होता. मात्र आता ते सुखरूप आहेत.

आनंद शिंदे आणि त्यांचा मुलगा डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. तसेच उद्धव ठाकरे यांनी शिंदे पिता-पुत्राला विधानसभेची ऑफर दिल्याची माहितीही होती.

दरम्यान, आतापर्यंत आरपीआयच्या नेत्यांनी लहान मोठ्या कलाकारांचा फक्त वापर केल्याचा आरोप करत, आनंद शिंदे यांनी रामदास आठवले आणि गवईंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.