“जसं काय महाराष्ट्र देशातला सगळ्यात सडका भाग आहे, असं….”

मुंबई | सत्ता कुणाला नको असते? रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू झालं आहे. ज्याप्रमाणे ही आक्रमणं होत आहेत. सत्ता मिळवा, पण ती सुद्धा आपल्याकडे लोकशाही आहे हे न विसरता प्रामाणिकपणे लोकांसमोर जाउन लोकांनी सत्ता दिली तर तुम्ही राज्य करा. पण आता सगळं मला हवंच, मतं नाही मिळाली तरी सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता मिळवीनच हा प्रकार देशाच्या राजकारणात नव्हता. त्यांनी हे देशाचं राजकारण नासवून टाकलं आहे. विकृत करून टाकलं आहे. त्यातूनच देशात राज्य आणि केंद्र संघर्ष सुरू झाला आहे. हा सत्तापिपासूपणा आहे. केंद्रात बसलोय म्हणून राज्याची मुस्कटदाबी करायची या प्रवृत्तीचा सगळ्यांनी निषेध करायला हवा, असं म्हणत मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

ते ज्या पद्धतीने चाललं आहेत, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीये का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

इतर राज्यांत बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर या केंद्रीय यंत्रणांकडे यंत्रणाच नाही का? गुजरातमध्ये मोठा घोटाळा बाहेर पडला. आपल्याकडे चिमूटभर सापडलं तर केवढा गहजब केला जातो. आपली तुळशी वृंदावनाची संस्कृती सोडून गांजा वृंदावनची संस्कृती रुजलीये, गांजाची शेती होतेय असं चित्र उभं करायचं. महाराष्ट्राला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

तुम्ही महाराष्ट्राचा आधार म्हणून उपयोग का करत नाही. महाराष्ट्र जणूकाही देशातला सगळ्यात सडका भाग आहे अशा पद्धतीने राजकारण चाललंय. धाडीमागू धाडी सुरू आहेत. ठीक आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. दिवस बदलतात. ते लवकर बदलतील यासाठी प्रयत्न करू नका, असंही त्यांनी म्हटलंय.

मधला कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. काही काळ मंत्रालयही बंद ठेवावं लागलं होतं. पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होतंय. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार. अधिवेशनातही मी जाणार, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी सत्ता दिली आहे. एकमेकांवर चिखलफेक करायची, त्याला बदनाम करायचं आणि वाट्टेल ते आरोप करायचं आणि म्हणायचं बघा आम्ही कसे गंगास्नान करून पवित्र आहोत आणि हे कसे गटारात राहणारे आहेत हे दाखवण्याचं जे गलिच्छ प्रकार सुरू झाले आहेत. हे सुदृढ लोकशाहीसाठी हानीकारक आहे, असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

“नरेंद्र मोदींनी समोर येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं…” 

“मी पुन्हा येईन यावर अनेकांचा विश्वास नव्हता पण…”

“मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, पण आता…”

आनंद महिंद्रांंनी केलं गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

IPLचं बिगुल वाजलं! 15 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, आता 5-5 चे दोन गट पडले