ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

मुंबई|  ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे आज निधन झालं आहे. गेले चार दिवस ते ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज दुपारी 12.30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांची बायपास करण्यात आली होती. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली येथे होतं. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचं बालपण गेलं. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या वातावरणातच ते लहानाचे मोठे झाले होते. त्यामुळे अभिनयाचं वेड त्यांना लागलेलं होतंच.

किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

‘आमराई’ या नाटकातून त्यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. खरं तर या नाटकात त्यांची भूमिका ‘बाप्पा’ अशी हाक मारण्यापूरतीच होती. मात्र, हीच त्यांची खरी सुरुवात होती. एका नामांकित वृत्तपत्राला मुलाखत देताना त्यांनी यासंदर्भात अनेक आठवणी सांगितल्या होत्या. पहिल्याच नाटकात भीती वाटल्यामुळे एक शब्द देखील तोंडून निघाला नाही आणि त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांचे हसे केले होते. हा माझ्यासाठी पहिला धडा होता असे ते नेहमी म्हणत.

‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ,चाल जाए पर वचन न जाए,’ ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांच्या भूमिका होत्या.

दरम्यान, किशोर नांदलस्कर अनेक वर्षांपासून बोरीवलीत राहात आहेत. पण त्यांची तब्येत बिघडल्याने ते ठाण्यात मुलाकडे राहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं असा परिवार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद’ प्रिया बापटच्या…

युजवेंद्र चहलला पहिली विकेट मिळताच पत्नि धनश्रीला अश्रू…

सैराटमधील आर्चीचा नवा लूक पाहिलात का?, नसंल पाहिला तर पाहा…

‘मास्क मुक्ती’ देणारा जगातील पहिला देश!…

कोरोना काळात ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर जाणून घ्या…