Top news महाराष्ट्र

काय सांगता ! पीओपी गणेश मुर्तींवर कडक निर्बंध, चूक केल्यास तब्बल 10 हजारांचा दंड

Photo Credit: Pixabay image

चंद्रपूर | सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी चालू झाली आहे. दुकानेच्या दुकाने गणेश मुर्तीने सजली आहेत. अशातच आता चंद्रपूर महानगरपालिकेने पीओपीच्या गणेश मुर्तींवर बंदी असल्याच्या निर्णय जाहीर केला आहे.

मनपा हद्दीमध्ये पीओपीच्या गणेश मुर्ती बनवणे, त्यांची आयात किंवा निर्यात करणे, तसेच त्यांची विक्री करणे या गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. महानगरपालिकेने शहरातील सर्व गणेश मुर्तीकारांची व व्यापाऱ्यांची मनपाच्या प्रशासकीय ईमारतीमध्ये बैठक बोलावत हा निर्णय घोषित केला आहे.

शहरातील कोणत्याही दुकानात पीओपीची गणेश मुर्ती आढल्यास त्या दुकानदाराला 10 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल. तसेच दुकानदाराचे डिपॉझीट जप्त करत त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले आहेत.

दरम्यान, पीओपी हे सर्व जीवसृष्टीसाठी धोक्याचे आहे. निसर्गावर त्याचे विपरीत परिणाम होतात. पीओपीपासून बनवलेल्या गणेश मुर्तींचे निसर्गावर गंभीर परिणाम होत असल्याने चंद्रपूर महानगरपालिकने कठोर पाऊले उचलली आहेत.