“मी सरकाविरोधात बोलले मला अटक कराच”

कोलकाता : काश्मीरमधील आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार बळाचा वापर करत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केला. सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल मला अटक करा, असे आव्हानही त्यांनी दिले.

रिझर्व्ह बँकेने सरकारला 1.76 लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरूनही ममतांनी केंद्रावर टीका केली. महत्त्वाच्या संस्था माजी नोकरशहा चालवत असून, ते सरकारचे हुजरे म्हणून काम करत आहेत, असे ममता म्हणाल्या.

‘काश्मीरमध्ये काय सुरू आहे? विरोधातील सर्व आवाज दाबवण्यासाठी सरकार काश्मीर खोऱ्यात बळाचा वापर करत आहे,’ असे ममता म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयकाला संसदेत विरोध केला होता, तसेच यावरील मतदानावेळी सभात्याग केला होता. ‘सर्वपक्षीय बैठक झाली असती, तर आम्ही आमचे मत मांडले असते. फारूक अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला सध्या कोठे आहेत, हे आम्हाला माहिती नाही,’ असेही ममता म्हणाल्या.

आपण सरकारविरोधात आवाज उठवतच राहणार असून, त्याबद्दल मला अटक करावी असे आव्हानही त्यांनी दिले. आम्ही भाजपसमोर झुकणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-