संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, वाचा सविस्तर

मुंबई | शिवसेेनेची धडाडती तोफ आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार आणि पैशांची अफरातफर याप्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने (Enforcement Directorate) रविवारी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले आणि विशेष सत्र न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांचा देखील या घोटाळ्यात हात असल्याचे ईडीचे म्हणने आहे. या सर्व घोटाळ्यातील पडद्यामागचे कलाकार संजय राऊत असून प्रवीण राऊत केवळ फ्रंटमॅन आहेत, असे ईडीने न्यायालयात सांगितले.

त्यामुळे आता ईडीच्या अहवालानुसार राऊतांची एकूण संपत्ती किती हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना राऊतांनी आपली संपत्ती अर्जात नमुद केली होती. त्यानुसार संजय राऊत यांच्याकडे एकूण 8 कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे 7 कोटी 27 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त संजय राऊत यांच्याकडे 2 कोटी 21लाख रुपये इतकी संपत्ती आहे तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे 96 लाख 79 हजार इतकी संपत्ती आहे.

संजय राऊत यांच्या नावे अलिबागमध्ये 3 शेतजमिनी असून त्याची बाजारभावी किंमत 4 लाख 34 हजार इतकी आहे. तर वर्षा राऊत यांची पालघर येथे 0.74 एकर जमीन असून त्याची किंमत 9 लाख रुपये आहे.

संजय राऊत आणि वर्षा राऊत यांचे दादर येथे प्रत्येकी एक – एक घर आहे. संजय राऊत यांच्यावर 1 कोटी 71 लाखांचे कर्ज असून वर्षा राऊत यांच्यावर 1 कोटी 67 लाखांचे कर्ज देणे बाकी आहे.

संजय राऊत हे शिवसेनेेचे मुखपत्र दैनिक सामना (Daily Samna) वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. तसेच शिवसेनेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार संजय राऊत हे शिवसेनेच्या 17 प्रमुख नेत्यांच्या यादीत आहेत.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच दिल्लीत पक्षाची भूमिका मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संजय राऊतांच्या कारकिर्दीची सुरुवात राजकारणी म्हणून नाही तर पत्रकार (Journalist) म्हणून झाली होती.

साप्ताहिक लोकप्रभाचे (Weekly Lokprabha) ते पत्रकार होते. तेथून त्यांचा प्रवास सामनाचे कार्यकारी संपादक (Executive Editor) असा झाला. त्यांनी लोकप्रभा साप्ताहिकात क्राईमचा पत्रकार (Crime Reporter) म्हणून काम केले होते. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या लेखांवर प्रभावित होऊन 1993 साली त्यांना सामना पत्रात कार्यकारी संपादक पदावर रुजू केले.

महत्वाच्या बातम्या – 

‘फक्त 11 लाखांसाठी का छळ चालवलाय?’, राऊतांवरील कारवाईवर जया बच्चन संतापल्या

भागवतांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले ‘मोहन भागवत मला आदर्श आहेत’

‘लायकी नसणाऱ्या राजकारण्यांच्या हातात देश दिलाय’, अभिनेता सुबोध भावेचं मोठं वक्तव्य

‘शरद पवारांचा खाकस्पर्श’, भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण

मोठी बातमी! संजय राऊतांच्या ईडी कोठडीत वाढ