सिंधुदुर्ग | राज्याच्या सर्वांगिण विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा राहिलेला आहे. सहकारातून समृद्धी हे ब्रिद महाराष्ट्रानं खरं करून दाखवलं आहे. परिणामी सहकारी संस्थांवर ताबा मिळवण्यासाठी राज्यात जोरदार चुरस पहायला मिळत असते.
कोकणाच्या विकासात महत्त्वाचा वाट असणारी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेचा निकाल आता हाती आला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली असली तरी ही निवडणूक राणे कुटुंबानं गाजवली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर सर्वाधिक काळ सत्ता राखलेल्या राणे गटानं पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकारण या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यानं पाहिलं आहे.
बॅंकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत राणे गटाच्या विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समान मतं मिळाली होती.
देवेश एडके या साडेतीन वर्षांच्या मुलाला चिठ्ठी उचलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. देवेशनं विठ्ठल देसाई यांच्या नावाची चिठ्ठी उचलल्यानं महाविकास आघाडीला आणि शिवसेनेच्या साम्राज्याला धक्का बसून सावंत यांचा पराभव झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनलप्रमुख म्हणून सतीश सावंत यांनी काम पाहीलं होतं. त्यांचा पराभव झाल्यानं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा देखील पराभव झाला आहे. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांचा विजय झाला आहे.
शिवसेनेनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर संतोष परब हल्ला प्रकरणात सध्या पोलिसांनी तपास चालवला आहे. परिणामी नितेश राणे यांच्यावरील या प्रकरणानं ही निवडणूक प्रचंड गाजली होती.
दरम्यान, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून राणेंच्या साम्राज्याला धक्का लावू शकले नाहीत, अशी टीका भाजपनं सरकारवर केली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष या निकालानंतरही कायम राहाणार हे नक्की.
महत्वाच्या बातम्या –
सतीश सावंतांच्या पराभवानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर, ‘ती’ पहिली पोस्ट व्हायरल
‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल
सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत
‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेर