“आधी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेणार आणि मगच सभागृहात जाणार”

मुंबई | ऐन लोकसभा निवडणकीत काँग्रेसची साथ सोडलेले नेते अब्दुल सत्तार यांनी आज आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा हाती घेतला.

शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकांमुळे मी सेनेत प्रवेश करत आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन. आधी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेईन, मग सभागृहात जाईन. सिल्लोडची जागा सर्वाधिक मताधिक्याने जिंकून येईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तारांची उमेदवारी जाहीर केली. 

सत्तार भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी तसे प्रयत्न देखील केले. परंतू त्यांना भाजपमधून विरोध झाल्याने वाद व्हायला नको म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला, असं सत्तार यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

महत्वाच्या बातम्या-