निबंधानं अनेकांच्या काळजाला पाझर फोडणाऱ्या मंगेशची बच्चू कडूंनी घेतली दखल!

मुंबई | काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मंगेश वाळके या 10 वर्षाच्या मुलाच्या ‘माझे बाबा’ निबंधाने अनेकांच्या काळजाला पाझर फोडला होता. यावर आमदार बच्चू कडू यांनी मंगेशच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार आहे आणि राज्यातील सर्व अनाथ मुलांसाठी 30 हजार रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचं सांगितलं आहे.

घरचा कर्ता पुरूष गेल्यानंतर त्याच्या मागील कुटुंबाचे काय हाल होतात हे यामधून दिसले. मंगेश आणि त्याच्या कुटुंबासोबत आज विधानभवन येथे भेट झाली. मंगेशच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आम्ही करणार. परंतु एकटा मंगेश हे हाल सोसतो असं नाही महाराष्ट्रात असे अनेक मंगेश आहे, असं कडूंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे जी अनाथ मुलांकरीता तसेच त्यांचे पालक अपंग आहेत अशांसाठी लवकरच 30 हजार रूपयंची वार्षिक शिष्यवृत्ती मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंगेश वाळके याला बीडचे पालकमंत्री आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ कल्याण विभागामार्फत दिव्यांग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रूपये स्वयंरोजगारासाठी, जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधीतून शेष 5% बसचा पास अशी भरीव आर्थिक मदत केली होती.