मुंबई | राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला तीन दिवसांपूर्वी सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यावेळी तिथल्या पायऱ्यांवर आंदोलन करणारे भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.
नितेश राणे मांजराचा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवत होते पण ठाकरेंनी वळून देखील पाहिलं नाही. नितेश राणेंच्या या आक्षेपार्ह वागणूकीनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे.
एकीकडे नितेश राणेंविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी नितेश राणेंचे कान टोचत त्यांना घरचा आहेर दिला आहे.
शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर सुनील प्रभू यांचा मुद्दा बरोबर आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना सुनावलं आहे.
अशा प्रकारे कोणावर टीका न करण्याचा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. तर पातळी सोडू नका, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंचे कान टोचले आहेत.
अशा विधानांची तपासणी करण्यासाठी आमदारांची समिती नेमायला कुणाचीही हरकत नाही,असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नितेश राणेंचा समाचार घेतला आहे.
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत एक आमदारांची समिती नेमायला हवी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. भाजप नेत्यांच्या भूमिकेमुळे नितेश राणेंना घरचा आहेर मिळाला आहे.
असं होणं चुकीचं आहे. अशा कृती सतत घडत असल्याने कारवाई करणं गरजेच आहे, असं मत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. पुढच्या काळात राणे विरूद्ध ठाकरे वाद आणखी चिघळणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. अधिवेशनाचा कालावधी वाढवून घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. राज्यात सुरू असलेल्या विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’
“अभिनेत्यानं माझं चुंबन घेतलं अन् माझ्या स्तनांना…”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
राज्याची चिंता वाढली! ओमिक्राॅन रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ, वाचा आकडेवारी