“निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करणे थांबवावे”

मुंबई | आगामी काळात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकांच्या तयारीवरून भाजपवर निशाणा साधला आहे.

इतर राज्यात निवडणुका आल्या की, भाजप प्रचाराचं महाराष्ट्राला साधन बनवून बदनाम करते. बिहार निवडणुकीच्या वेळी सुशांतसिंग प्रकरण आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान ड्रग्जचा मुद्दा उपस्थित केला गेला, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहेे.

यावेळी नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. हे वानखेडे प्रकरणात दिसुन येते. केंद्र सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणे थांबवावे, असंही नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केले तर जनता ते खपवून घेणार नाही, असं नाना पटोले यांनी सांगितलं. भाजप सरकारच्या काळात जनतेची लुट सुरू असून जनजागरण मोहिम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवून देशाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

कोरोना महामारीनंतर आर्थिक कमजोरी देशात आली. त्यानंतर देखील भाजपने जीवनावश्यक वस्तु्ंच्या किंमती वाढवून जनतेचे खिसे कापण्याचे काम सुरू केले आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.

60 रूपये पेट्रोल आणि डिझेलवर केेंद्र सरकार सेसच्या रूपात जनतेची लुट करत आहे. ज्याठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे तिथे व्हॅटचे दर कमी करून  जनतेला मदत करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

तसेच महाराष्ट्र सरकारला देखील काँग्रेसच्या वतीने व्हॅट कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत जागा न मिळाल्याने नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये खदखद सुरू आहे, हे स्पष्ट आहे. त्याचे परिणाम काय होणार हे पुढच्या काळात स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांवर नाना पटोलेंनी सावध प्रतिक्रीया दिली आहे. कोणाच्या व्यक्तीगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या वक्तव्यामध्ये आम्हाला काहीही स्वारस्य नाही, असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी एकंदरीत भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरून टीका केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने महाराष्ट्राला बदनाम करणे थांबवावे असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पंकजाताईंना सुद्धा संधी मिळेल, वर्षभरात खुप स्कोप”

“या सरकारचा किमान-समान कार्यक्रम म्हणजे वसूलीचा कार्यक्रम”

गहलोतच राजस्थानचे पायलट! राजस्थान काॅंंग्रेसचा कलह संपला

 “उगाच माथी भडकाऊ नयेत, फडणवीसांनी थोडा संयम बाळगायला हवा”

 विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी! प्रमोद महाजन यांची जागा घेणारे दुसरे नेते ठरले तावडे