रोहित पवारांच्या उपस्थितीत सरपंचासह भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील भाजपचे पदाधिकारी, सरपंच आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे दुधोडीचे अध्यक्ष संतोष कोराळे, सरंपच राजेंद्र परकाळे, बाळासाहेब भोसले, अमोल हरीभाऊ, राजेंद्र जांभळे, नाना कोराळे यांच्यासह बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय भिसे आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कर्जत-जामखेडची निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे. यामुळे मतदारसंघात नवे पर्व सुरू झालं आहे. अनेकजण पक्षात येत आहेत, येणार आहेत. कारण जनतेला बॅनर लावून विकास होत नाही हे आता समजलं आहे, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

कर्जत तालुक्यातील अनेक मुलींना शिक्षणासाठी नऊ किलोमीटर पर्यंत पायी शाळेत जावं लागतं. शनिवारी लवकर शाळा सुटल्यावर टेम्पोला लटकून घरी यावं लागते. हाच विकास आहे का? आम्ही पाण्यासाठी चारी खोदून देतो म्हटल्यावर पालकमंत्र्यांनी धावपळ करून चारी खोदण्यास सुरूवात केली, असं सांगत रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनेक गावांमध्ये हे फिरकले देखील नाहीत. फक्त गट तटाचे राजकारण करून सत्ता मिळवायची, ती मिळाल्यावर गावातील एक दोन जणांना हताशी धरून जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं, हे आता बंद होईल, असं रोहित पवार म्हणाले आहेत.