“अनिल देशमुखांच्या तुरूंगातील प्रत्येक तासाची किंमत भाजपला मोजावी लागेल”

नागपूर | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. त्यानंतर ईडी आणि सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. त्याप्रकरणावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला धमकीवजा इशारा दिला आहे.

राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. काही लोकांच्या हातातून सत्ता गेली त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या यंंत्रणांच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शरद पवार यांनी भाजपवर केला आहे.

माजी गृहमंत्री ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरूंगात टाकले आहे. त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत भाजपला आज ना उद्या मोजावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी भाजपला दिला आहे.

यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंह भेटायला आल्याचं देखील सांगितलं. एक दिवस मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितले की, अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार आहे. ती तक्रार मला मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालायची आहे. त्यांना राज्य सरकारने फरार घोषित केलं आहे.

मी विचारले काय तक्रार आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला अशा सुचना दिल्या आहेत. मी विचारले त्या सुचनांचे पालन केले का? त्यांनी सांगितलं नाही.  पोलीस आयुक्तांची तक्रार देशमुख यांना समजली. ते माझ्याकडे आले तसेच ते म्हणाले की, आरोपांची शहानिशा होईपर्यंत मी राजीनामा देतो, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

आज देशमुख तुरूंगात आहेत, हे कशामुळे घडले तर एका आयुक्तांच्या तक्रारीमुळे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी केली. आज ते पोलीस आयुक्त कुठे आहेत, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला .

अनिल देशमुख प्रकरणात केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केला, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी शरद पवारांनी एकनाथ खडसे यांच्यावर जाणीवपुर्वक कारवाई करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं आहे.

एकनाथ खडसे भाजपचे विरोधी पक्षनेते होते. अनेक वर्षे त्यांनी भाजपचे नेतृत्व केलं. ते राष्ट्रवादीमध्ये आले त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर खटले भरले गेले, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही करता येत नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांच्या घरी लोक पाठवले. त्या तपासात काही मिळाले नाही तरी त्यांनी पाच दिवस घर सोडले नाही. त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच दिवस हलायचे नाही, असे दिल्लीचे आदेश आहेत, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याकडेही काही सापडले नाही. आपल्या हातातून सत्ता गेल्यामुळे अनेकजण अस्वस्थ आहेत. परंतु, मी सांगतो की, सामान्य माणसाची ताकद घेऊन तुृम्हाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी विरोधकांना खडसावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

रोहितची विजयी सलामी! रोमांचक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

काँग्रेसला धक्क्यावर धक्के! 4 माजी मंत्री आणि 3 माजी आमदारांनी ठोकला रामराम

अखेर परमबीर सिंह फरार घोषित; आता उरले फक्त 30 दिवस

‘पाकव्याप्त कश्मीरचा ताबा सोडा’; डॉ. काजल भट यांनी पाकिस्तानला खडसावलं

आयसीसीमध्ये चालणार ‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी