ईडी कार्यालयात जाण्याचा शरद पवारांनी इव्हेंट केला; चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे |  शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याचे समजताच राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांच्या विनंतीला मान देऊन पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय पाठीमागे घेतला. यावरूनच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

ईडी कार्यालयात जाण्याचा शरद पवारांनी इव्हेंट केला, अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

आकसाने कारवाई केली म्हणून निदर्शने करता मग छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हा कुठे होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते?? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. चार जणांनी जाऊन भाजपच्या कार्यालयाला काळं फासायचं याने काय होणार आहे, असंही पाटील म्हणाले.

या देशात कम्पलेंट्स करण्याचे फोरम ठरलेले आहेत. अन्याय झाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, असा सल्लाही त्यांनी पवारांना यावेळी दिला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-