“अगोदरच प्रवेश केला असता तर आज हर्षवर्धन पाटील ‘बारामतीचे’ खासदार झाले असते”

मुंबई |  काँग्रेस राष्ट्रवादीमधील आऊटगोईंग काही थांबता थांबत नाहीये. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपत प्रवेश केला आहे. झालेल्या अन्यायाविरूद्ध आता लढायचंय, असं म्हणत मुख्यमंत्री महोदय तुमची आम्हाला साथ हवी आहे आणि तुम्ही आम्हाला न्याय द्यावा, असं पक्षप्रवेशावेळी पाटील म्हणाले.

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने मात्र सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अगोदरच प्रवेश केला असता तर हर्षवर्धन पाटील आज बारामतीचे खासदार झाले असते, असं पाटील म्हणताच सभागृहात खसखस पिकली आणि टाळ्यांचा कडकडाटही झाला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी हर्षवर्धन पाटील यांना भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी भाजपची ऑफर धुडकावून लावत राष्ट्रवादीचा प्रचार केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हर्षवर्धन पाटील साहेब किती दिवस तुम्ही बारामतीकरांची सेवा करणार, असं म्हणत पक्षप्रवेशाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र मला त्यानंतर 5 वर्ष हर्षवर्धन पाटील यांची वाट पहावी लागली, असं आज मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. पक्षाने माझ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. ती जबाबदारी मी निष्ठेने पार पाडील, असा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

महत्त्वाच्या बातम्या-