संभाजीराजेंचा एल्गार! आमरण उपोषण नक्की कशासाठी?; दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | मराठा आरक्षण हा मुद्दा जितका भावनिक होतोय, तितकाच कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आता अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील गल्लीतून ते राजधानी दिल्लीपर्यंत आवाज उठवणारे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे आता आक्रमक झाले आहेत. संभाजी राजेंनी मराठा आरक्षणाच्या लढाईतलं महत्त्वाचं पाऊल टाकत असल्याची घोषणा केली आहे.

संभाजी राजे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. परिणामी राज्याच्या समाजकारणाला आणि राजकारणाला दिशा देण्यात हे आंदोलन महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची शक्यता आहे.

संभाजी राजेंनी आपल्या उपोषणाबाबत सविस्तर माहिती त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून प्रसिद्ध केली आहे. आपण कोणत्या कारणानं आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबत आहोत हे देखील राजेंनी सांगितलं आहे.

26 फेब्रुवारीपासून मी आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहे, ते नेमकं कशासाठी?, हे सर्वप्रथम सर्वांनी समजून घेणं गरजेचे आहे. मराठा आरक्षण मिळवणं, हे आपल्या सर्वांचे प्रमुख उद्दिष्ट असले तरी, ती एक दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रिया आहे, असं राजे म्हणाले आहेत.

सध्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ती पूर्ण होऊन आरक्षण मिळण्यास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र तोपर्यंतच्या काळात मराठा समाजाने काय करायचे?, आरक्षण नसल्यामुळे समाजाचे होणारे शैक्षणिक, सामाजिक व नोकऱ्यांमधील नुकसान व या अन्यायाची झळ कमी व्हावी, असं राजे म्हणाले आहेत.

मराठा समाजासाठी आपण शासनाकडे काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शासनाने या मागण्या मान्य देखील केल्या आहेत. मात्र आज आठ महिने उलटले तरी अजून त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, असं राजे म्हणाले आहेत.

मराठा तरुण अजूनही अन्यायाच्या गर्तेतच सापडलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रमुख मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी व मराठा समाजाची आरक्षणावाचून होणारी होरपळ कमी करावी, याकरिता मी उपोषणास बसत आहे, असं संभाजी राजे म्हणाले आहेत.

भोसले समितीने केलेल्या शिफारशींची देखील अंमलबजावणी करण्यास तात्काळ सुरूवात करून लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी देखील राजेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा

EPFO कडून खातेधारकांना अलर्ट जारी, तुम्हीही ‘या’ चुका करू नका

“…त्यामुळे भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही”, अमित शहांनी सांगितलं कारण

बिल गेट्स यांनी दिला जगाला धोक्याचा इशारा, म्हणाले “कोरोनानंतर आता…”

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारचा दणका