या काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; भेटीवर आमदार म्हणतात…

पंढरपूर |  मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापुरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सावळ्या विठुरायाचं दर्शन तर घेतलंच पण या दौऱ्यात त्यांनी आपलं राजकीय कसब वापरून आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या काही संभाव्य परिस्थितीवर काम केलं. त्यातीलच एक महत्वाची भेट म्हणजे काँग्रेस आमदार भारत भालके यांची भेट…!

आषाढी दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं सोलापुरात आगमन झालं अन् त्यांच्या स्वागताला काँग्रेस आमदार सिद्धराम मेहत्रे आणि भारत भालके तयार होते. या दोन काँग्रेस आमदारांनी मोठ्या आनंदाने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. 

काँग्रेस आमदार भारत भालके यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. भालके भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. विखेंबरोबरच भालकेसुद्धा प्रवेश करतील अशीही चर्चा होती. खुद्द विखे पाटीलच मुख्यमंत्र्यांना घेऊन भालकेंकडे गेले होते.

भेटीवर भारत भालकेंना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री पंढरपुरात आले होते. त्यांना घरी येण्याचं आमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनीही माझ्या विनंतीला मान दिला अन् ते घरी आले. यात लगेच राजकीय अर्थ काढणे बरोबर नाही. जर राजकारणाचीच चर्चा करायची असती तर मुंबईत खूप जागा होती.

दरम्यान, विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये. भाजपला 220 चा आकडा गाठायचा आहे. हेच लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीत विरोधी पक्षांच्या आमदारांना भेटून चांगलाच चाणाक्षपणा दाखवला असल्याचं बोललं जात आहे.