मुंबई | संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात करतो. कोळशाचे वीज निर्मितीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली तर वीज निर्मितीचा प्रश्नही मिटेल आणि संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वेस्टर्न कोलफिल्डच्यावतीने महाराष्ट्रातील नागपूर जवळील आदासा याठिकाणी एक आणि मध्यप्रदेशातील दोन कोळसा खाणींचे आज मुख्यमंत्र्यांच्या तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो, श्वसन व इतर आजार उद्भवतात. कोळशातील राखेचे प्रमाण कमी करण्यासाठी कोळसा धुण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे झाल्यास प्रमाण खूप कमी होऊ शकते. त्यासाठी वॉशरीज चांगल्या हव्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोळशाच्या खाणी जेव्हा उत्पादन पूर्ण झाल्यावर बंद केल्या जातात तेव्हा त्या तशाच न सोडता त्यावर झाडे फुलवून, त्या जागेवर जंगल तयार केल्यास पर्यावरणाला मदत होईल. कोळसा खाणी बंद करण्याचा कालावधी पण निश्चित केला पाहिजे असेही ते म्हणाले.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज मार्गाचा शुभारंभही लवकरच करण्यात येईल. त्यादृष्टीने आवश्यक ती तयारी राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या-
-आईचा चिमुकलीला दम; उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांना का त्रास देताय?
-उद्धव ठाकरेंचा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश… फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया
-लॉकडाऊन काळात भुजबळांचं खातं ‘अॅक्टीव्ह’, अन्न नागरी पुरवठा विभागाचा अन्नधान्य वाटपात विक्रम
-कोरोना रुग्णांवर उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा- अजित पवार
-केरळच्या हत्तीणीच्या पोस्टमाॅर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आलंय मृत्यूचं कारण?