मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घोटाळ्याचे आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभं राहणार आहे, मात्र या कामात सत्ताधारी भाजप सरकारने घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं केला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

शिवस्मारकाची एक वीटही न रचता ८० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. हे पैसे देण्यासाठी दबाव आणल्याचा दावा अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रात आहे, असा आरोप त्यांनी केला.

टेंडर दिल्यानंतर कामात बदल करता येत नाहीत. मात्र शिवस्मारकाच्या कामात बदल केले गेले. हे करताना तांत्रिक समितीची परवानगीही घेतली नाही. २ जूनला या विभागाच्या लेखापालने आपल्या हस्ताक्षरात एक नोट लिहिली आहे. शिवस्मारकात झालेली वाटाघाटी ही मार्गदर्शक तत्वांना धरुन नाही. शिवस्मारकाचे काम सुरु राहीले तर हलक्या प्रतीचे काम होईल ,असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक आणि सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात आम्ही केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार आहोत. या घोटाळ्यात केवळ अधिकारीच नाहीत तर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग आहे, असा आरोपही सावंत आणि मलिक यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-