महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला असताना भाजपने अखेर सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्यात अधिकृतपणे उडी घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी भाजपने राज्यपालांना पत्र देत बहुमत चाचणीची मागणी केली आहे.

भाजपने ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष भेटून राज्यपालांकडे बहुमत चाचणी व्हावी, अशी विनंती केली आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तब्बल 8 दिवसांनंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही असा बंडखोर आमदारांचा पवित्रा आहे. त्यामुळे शिवसेनेचे 39 आमदार महाविकास आघाडी सरकारला समर्थन देत नाहीत असं दिसतं, असं फडणवीस म्हणाले.

सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करायला लावावं, अशी विनंती करणारं पत्र राज्यपालांकडे दिलं असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रात सत्तापालट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, 30 जून रोजी सकाळी 11 वाजता राज्यपालांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. भाजपच्या मागणीनंतर आता महाविकास आघाडी सरकारला 30 तारखेला  बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुमचे पुत्र, प्रवक्त्यांनी बाप काढायचा आणि तुम्ही समेटाची हाक द्यायची’, शिंदेंचा घणाघात

रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींची पायउतार, आकाश अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी

“घरातील मोठा भाऊ असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा”

‘आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा’, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला