अंपायर म्हणाला ‘नॉट आऊट’, धोनी म्हणाला ‘आऊट’; पाहा नेमकं काय झालं…

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्व गुणाचं कायमच कौतुक झालं आहे. सध्या सुरु असलेल्या आशिया चषकात तसेच गेल्या काही दिवसांपासून त्याने कर्णधारपद सोडलं आहे. मात्र मोक्याच्या वेळी कर्णधारानं घ्यायचा निर्णय घ्यायला धोनी विसरत नाही. उलट कोहली असो वा रोहीत शर्मा अवघड क्षणी ते निर्णय घेण्यासाठी धोनीची मदत घेतात हे वारंवार अधोरेखित झालं आहे. नवा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात असाच एक निर्णय धोनीच्या भरवश्यावर घेतला आणि नेहमीप्रमाणे संघाला त्याचा फायदा झाला. 

नेमका काय घडला प्रकार?

भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीवर इमाम उल हक चकला आणि चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपिल केलं. अंपायर भारतीय खेळाडूंच्या या अपिलनं थोडे भांबावलेले दिसले मात्र त्यांनी नॉट आऊट असा निर्णय दिला. यष्टीमागे उभ्या असलेल्या महेंद्रसिंग धोनीला हा निर्णय पटला नाही. कर्णधार रोहित शर्मानेही महेंद्रसिंग धोनीशी चर्चा केली. 

धोनीने नेमका काय सल्ला दिला-

कर्णधार रोहित शर्मा यूडीआरएस घ्यायचा की नाही याबाबत साशंक होता. महेंद्रसिंग धोनीनं सारं चित्र यष्टीमागून स्पष्ट पाहिलं होतं. त्याने रोहित शर्माला यूडीआरएस घेण्याचा सल्ला दिला. धोनीचं ट्रॅक रेकॉर्ड माहित असल्यानं रोहित शर्मानं वेळ न दवडता लगेच यूडीआरएस घेतला. चहलचा चेंडू पुन्हा पाहण्यात आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंपायरचा निर्णय चुकीचा ठरला होता. धोनीने नेहमीप्रमाणे आपल्यातील कमालीच्या अचुकतेचं दर्शन घडवलं होतं. भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनीला का जागा मिळते? याचं उत्तरही या एका प्रकारामुळे अनेकांना मिळालं असेल.