मुंबई| राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं आहे. सर्व राजकीय पक्ष मतांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने 6 तर भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच विधानपरिषदेची निवडणुक रंगतदार होणार आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार पुन्हा नाकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता यावं म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात याचिका केली होती. सदर याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. न्यायमुर्ती एन. जे. जमादार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण निकाल दिलेला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून मतदान करणं हा घटनात्मक हक्क आणि कर्तव्य आहे. अशा परिस्थितीमध्ये न्यायालय आपल्याला केवळ काही तासांपुरता जामीन देऊ शकते, अशी विनंती नवाब मलिक यांच्यातर्फे करण्यात आली होती.
यापुर्वी विविध कारणांसाठी न्यायालयाने विशेषाधिकारात तात्पुरता जामीन दिला होता. जोपर्यंत आरोपीवरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत तो निष्पाप असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधीला त्याचे कर्तव्य करण्यापासून वंचित ठेवणे योग्य होईल का?,असा प्रश्न करत विशेषाधिकारात आदेश देऊन तात्पुरत्या जामीनावर सुटका करावी, असा युक्तिवाद अनिल देशमुखांच्या वकिलांनी केला.
लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 62 अन्वये कोणत्याही प्रकारच्या कैद्याला कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अर्जदारांची विनंती चुकीची आहे. कायद्याने परवानगी नसेल तर न्यायालयाकडून परवानगी मागू शकत नाही, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला.
दरम्यान, काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”
दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण
“राष्ट्रपती निवडणुकीसाठी मी काही डावपेच रचलेत, माझा अर्ज 100 टक्के जाणार”