‘पक्ष वाचवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक’, एकनाथ शिंदे मागणीवर ठाम

मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंडखोरीची भूमिका घेत शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जर माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेल तर काय म्हणावं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली. तर बंडखोर आमदारांनी मला समोर येऊन सांगितलं तर मुख्यमंत्रीपदच काय तर शिवसेनाप्रमुख पद देखील सोडायला तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वर्षा निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, या प्रस्तावाला काँग्रेसनेही मान्यता दिली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेची चर्चा होत असताना एकनाथ शिंदेंनी ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी या अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आहे.  तर यात शिवसैनिक फक्त भरडला गेला असल्याचं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसेना आणि शिवसैनिकाचं पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. महाराष्ट्राच्याहितासाठी आता निर्णय घेणं गरजेचं आहे, असा इशारा देखील एकनाथ शिंदेंनी दिला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्ता नाही, या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘संजय राऊत खुश कारण त्याला…’, नारायण राणेंची तुफान टोलेबाजी

‘माझ्याच लोकांना मी नको असेल तर मग काय करायचं’; उद्धव ठाकरे भावूक

“गायब आमदारांनी समोर येऊन सांगा मी नालायक आहे राज्य कारभार करायला”

‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरू’, नवनीत राणांची खोचक टीका

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, उद्धव ठाकरेंचा ‘हा’ निर्णय केला रद्द