शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या पत्राने खळबळ; बडवे उल्लेख करत केले अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ( Sanjay Shirsath ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यात आमदारांच्या नाराजीचं कारण तसेच आमदारांच्या भावना शिरसाट यांनी मांडल्यात. यात त्यांनी उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर, संजय राऊत यांच्यावर नाव न घेता आरोप केले आहेत.

आम्ही आतापर्यंत शिवसेनेत होतो, मात्र तुम्ही आम्हाला कधीही मोकळेपणाने भेटू दिलं नाही. तुमच्या बंगल्याची दारं सर्वसामान्यांसाठी कधीची खुली नव्हती, अशा शब्दांत शिरसाट यांनी आपली नाराजी व्यक्त केलं आहे.

काल खऱ्या अर्थानं वर्षा बंगल्याची द्वारं सर्व सामान्यांसाठी उघडली गेली. लोकांमधून निवडून येणाऱ्या आणि विधान परिषद, राज्यसभेवरील बडव्यांची आम्हाला मनधरणी करावी लागत होती,  अशी खंत आमदार संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका बसण्याची शक्यता 

शिंदे-भाजप युतीबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या ट्विटमुळे मोठी खळबळ 

‘तुम्ही ठरवा, आता शिवसेनेची जबाबदारी तुमची’; आमदारांमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल 

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताच सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल! 

“आमचा विठ्ठल चांगला, अवतीभवतीच्या बडव्यांमुळे आमचा विठ्ठल बदनाम होतोय”