‘लवकरच भाजपचे बुरे दिन येणार’, राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई | गोरेगावच्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेवर भाष्य केले आहे. मी नुकतच संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आलो आहे आणि संजय राऊत झुकणार नाही. त्यांचा मला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

संजय राऊत हे स्पष्टवक्ते आहेत, त्यांना अन्यायाची चीड आहे. भाजप ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कारस्थान करत आहे, त्याच्याविरोधात ते बोलतात. आणि म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे, असे ठाकरे म्हणाले.

संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. ते पत्रकार देखील आहेत. पत्रकार लोकशाहीचे चौथे स्तंभ (Fourth Pillar of Democracy) असतात, भाजपने लोकशाहीच्या एका स्तंभाला अटक केली आहे आणि हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राजकारण म्हणजे बुद्धीबळाचा खेळ असतो. पण सध्या देशाच्या राजकारणात फक्त बळाचा वापर केला जातो आहे. सध्या सुरु असलेले राजकारण घृणास्पद आहे. सर्व दिवस सारखे नसतात. एक दिवस असा येईल की, भाजपचे दिवस फिरतील आणि जे तंत्र ते इतरांना वापरत आहेत, तेच तंत्र एक दिवस त्यांच्यावर वापरले जाईल, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरले.

काँग्रेसने (Congress INC) या देशावर सर्वाधिक काळ राज्य केले. त्यांचेही दिवस गेले. भाजपचे सुद्धा गेल्याशिवाय रहाणार नाहीत. आणि ती वेळ लवकरच येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अच्छे दिनांचे माहित नाही पण भाजपचे लवकरच बुरे दिन येतील, असा दावा देखील ठाकरेंनी यावेळी केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या बिहारमधील कालच्या (दि. 31 जुलै) च्या भाषणाचा हवाला देत त्यांच्यावर निशाणा साधला. देशातील राज्यात प्रादेशिक पक्ष उरणार नाही आणि देशात एकच भाजप पक्ष राहील, असे नड्डा म्हणाले होते.

त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नड्डा आपला मनसुबा सांगून बसले. त्यांना देशात कोणताही विरोधी पक्ष नको आहे. त्यांना हुकुमशाही व्यवस्था चालवायची आहे. लोकशाहीच्या विरोधात त्यांचे काम सुरु आहे आणि नड़्डा यांचे हे वक्तव्य देशाला आणि लोकशाहीला घातक आहे.

कोणत्याही प्रकारे देशातील विरोधी पक्ष संपवायचा आणि देशावर भाजपची एकहाती सत्ता आणायची, असा भाजपचा डाव आहे. त्यामुळे केंद्रीय संस्थांचा वापर करुन एकतर विरोधकाला नमोहरम करायचे किंवा त्याला शांत करुन आपल्या पक्षात घ्यायचे काम भाजप करीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

शिवसेनेबाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी! संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊतांच्या अटकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“कुठल्या तोंडाने सांगू घात झाला, तो पण आपल्या माणसाने केला”

एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ