सगळं बदलता येतं पण ‘शेजारी’ नाही; हर्षवर्धन पाटलांचा पवार घराण्यावर निशाणा

मुंबई | काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केलेल्या भाषणात सगळं काही बदलता येतं पण ‘शेजारी’ नाही, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. माझा समाज अन्यायग्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना न्याय द्यावा, असंही ते म्हणाले.

इंदापुरची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नाही किंवा त्यांची तशी चिन्ह नाहीत, असा आरोप करत पाटील यांनी इंदापुरात जनसंकल्प मेळावा घेतला होता. खरं तर त्याच दिवशी त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाविषयी संकेत दिले होते. राष्ट्रवादीवर आरोप करत कायम त्यांनी आपल्यावर अन्याय केल्याची भावना पाटील यांनी बोलून दाखवली होती.

मागील काही महिन्यांपूर्वी इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली होती. त्याच सभेत अजित पवार यांनी आघाडी तुटली तरी बेहत्तर पण इंदापुरची जागा काँग्रेसला सोडणार नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. तेव्हापासून काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता होती.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून शेवटच्या क्षणाला हर्षवर्धन पाटील यांना थोपवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. पण पाटील यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असल्याने त्यांनी ‘नॉट रिचिबल’ राहणं पसंत केलं आणि आज अखेर त्यांनी भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं.

मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. पक्षाने माझ्यावर कोणतीही जबाबदारी टाकावी. ती जबाबदारी मी निष्ठेने पार पाडील, असं पक्षप्रवेशावेळी पाटील यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-