भारताचा वेस्ट इंडीजवर 318 धावांनी धुव्वा; परदेशातला सर्वात मोठा विजय

अँटिगा : अँटिगा कसोटीच्या  चौथ्या दिवशीच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 318 धावांनी धुव्वा उडवला. परदेशी भूमीत भारताने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली. तर अजिंक्य रहाणेने दोन वर्षांनंतर दमदार कसोटी शतक लगावलं.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 419 धावांचं बलाढ्य आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची पुरती दमछाक झाली. वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या 100 धावांवर आटोपला. हा परदेशी भूमीत भारताने सर्वाधिक धावांच्या अंतराने मिळवलेला कसोटी विजय ठरला आहे.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 102 धावांची दमदार खेळी उभारली. त्याला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. तर हनुमा विहारीचं शतक ‘नर्व्हस नाईन्टीज’मध्ये हुकलं. हनुमाने दहा चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. कर्णधार कोहलीने 51 धावांचं योगदान दिलं.

अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आपला दुसरा डाव सात बाद 343 धावांवर घोषित केला होता. त्यामुळे टीम इंडियाला दुसऱ्या डावात 418 धावांची भली मोठी आघाडी घेता आली.

भारताकडून जसप्रीत बुमराने दुसऱ्या डावात सर्वाधिक पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर इशांत शर्माने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर नांगी टाकली. नवव्या क्रमांकावर उतरलेला विंडीजचा फलंदाज केमार रोशने केलेल्या 38 धावा सर्वाधिक ठरल्या.

महत्वाच्या बातम्या-