‘या’ एमआयडीसीमध्ये हजारोंना रोजगारांची संधी; उद्योगमंत्र्यांनी दिली खुशखबर

मुंबई | दिल्ली-मुंबई- इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या क्षेत्रांपैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर माणगाव एमआयडीसी स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माणगाव तालुक्यात ३२७७ हेक्टर इतक्या क्षेत्राचा ताबा एमआयडीसीला प्राप्त झाला असून महामंडळ स्वतःच्या व खाजगी सहभागातून या क्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण करू शकते. राज्याची स्वतःची क्षमता, गुंतवणुकदारांची मागणी व कोकणात रोजगार निर्मितीची निकड लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे, असे उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले.

नुकतेच देशातील प्रमुख औषध उत्पादकांना उद्योगमंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असता उद्योगपतींनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. परदेशी व देशातंर्गत गुंतवणुकीतून विशाल प्रकल्प उभे राहिल्यास फार मोठ्या संख्येने लघु व मध्यम उद्योगांचे जाळे या क्षेत्रावर विकसित होऊन सुमारे एक लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित होईल, शिवाय हजारोंच्या संख्येने नोकऱ्या व अप्रत्यक्ष रोजगारास चालना मिळेल, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात सध्या ५५ हजार उद्योग सुरू झाले असून त्यात साडेतेरा लाख कामगार रुजू झाले आहेत. येत्या काही दिवसांत इतर ठिकाणीचे उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांना पाठविण्यात येईल, असेही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या-

-अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

-रायगडच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताच मुख्यमंत्र्यांची लगोलग 100 कोटींची घोषणा

-“फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हाच कौल होता, मात्र सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला”

-पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांनी केलं राजभवन येथे वृक्षारोपण

-…म्हणून भाजपच्या ‘या’ महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल