IPL 2021: चेन्नई सुपर किंग्स संघाचा दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सवर 45 धावांनी केली मात

मुंबई| इंडियन प्रीमियर लीगच्या 2021 हंगामातील 12 वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघांत खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने 45 धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा हा आयपीएल 2021 मधील दुसरा विजय आहे. या सामन्यात चेन्नईने 188 धावा बनवताना एक अनोखा विक्रम नोंदविला.

चेन्नईने यावेळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना पिछाडीवर टाकले आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या मोइन अली आणि रवींद्र जडेजा यांनी आजच्या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. या फिरकीपटूंच्या जोरावरच चेन्नईला राजस्थानवर दणदणीत विजय मिळवता आला.

ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची सुरुवात केली. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर ऋतुराजचा अवघड झेल राहुल तेवतियाने सोडला. मात्र, या जीवदानाचा ऋतुराजला फायदा उचलता आला नाही. चौथ्या षटकात मुस्तफिजुरने त्याला वैयक्तिक 10 धावांवर झेलबाद केले. शिवम दुबेने त्याचा झेल घेतला.

त्यानंतर डु प्लेसिसने आक्रमक होत उनाडकटच्या तिसऱ्या षटकात 19 धावा वसूल केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ख्रिस मॉरिसने डु प्लेसिसला बाद केले. डु प्लेसिसने 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 33 धावा केल्या. पहिल्या 6 षटकात चेन्नईने 2 बाद 46 धावा उभारल्या. त्यानंतर मोईन अलीने थोडी फटकेबाजी केली, मात्र, 10व्या षटकात त्याला राहुल तेवतियाने बाद केले. अलीने 26 धावांचे योगदान दिले.

सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईला शंभरीपार नेले. या दोघांनी संघासाठी 45 धावांची भागीदारी उभारली. 14व्या षटकात चेतन साकारियाने रायुडू आणि रैनाला बाद केले. रैनाने 18 तर रायुडूने 27 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या धोनीकडून मोठ्या  खेळीची अपेक्षा होती. मात्र, 18 धावा काढून तो माघारी परतला. साकारियाचा तो तिसरा बळी ठरला.

धोनीनंतर जडेजाही स्वस्तात बाद झाला. शेवटच्या काही चेंडूंमध्ये ब्राव्होने उपयुक्त धावा जोडल्या. राजस्थानकडून साकारियाने 3, मॉरिसने 2 तर, मुस्तफिजुर आणि तेवतिया यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मनन वोहरा आणि जोस बटलर यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. 30 धावांची भागीदारी केल्यानंतर सॅम करनने वोहराला बाद केले. जडेजाने वोहराचा झेल घेतला. दुसऱ्या बाजूने बटलरने आपली आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात करनने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (1) माघारी धाडले. पॉवरप्लेमध्ये राजस्थानने 2 बाद 45 धावा केल्या. बटलरने शिवम दुबेसह भागीदारी करत 10 षटकात 2 बाद 81 धावा उभारल्या.

जडेजाने 12व्या षटकात गोलंदाजीला येत बटलरला अर्धशतकापासून वंचित ठेवले. बचाव करताना वळलेला चेंडू बटलरची दांडी घेऊन गेला.  बटलरने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 49 धावा जोडल्या. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जडेजाने शिवम दुबेला पायचित पकडत राजस्थानला अजून संकटात टाकले. त्यानंतर पुढच्याच षटकात मोईन अलीने डेव्हिड मिलरला पायचित पकडले.

15व्या षटकात मोईन अलीने रियान पराग (3) आणि ख्रिस मॉरिसला (0) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. राहुल तेवतिया आणि जयदेव उनाडकट यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. 20 षटकात राजस्थानला 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून मोईन अलीने केवळ 7 धावा देत सर्वाधिक 3 बळी घेतले. सॅम करन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी 2 बळी घेता आले.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थान आणि चेन्नईने त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा दुसरा विजय आहे. धोनीच्या टीमने तीनपैकी दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला.

महत्वाच्या बातम्या – 

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा काय आहेत…

‘दिग्दर्शकानं मला….’. ‘या’…

सायली संजीवचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…

‘मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय आणि इथे आयपीएल खेळवली…

जाणून घ्या! कोरोना काळात ‘या’ पदार्थांचे सेवन…